News at Jains

Home › News at Jains

शिवनेरी किल्ल्यावर जैन ठिबकवर फुलणार देवराई; जैन इरिगेशनने जपली सामाजिक बांधिलकी!

18th Feb, 2021

छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर वन विभागाच्या वतीने देवराई साकारण्यात येत आहे. यासाठी जैन उद्योग समूहाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत (सीएसआर) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सामाजिक दायित्वातून पहिल्या टप्प्यात सुमारे २१ लाखांची ठिबक सामग्री बसविण्यात येणार आहे. हा प्रकल्प जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या पुढाकाराने आणि पुरातत्त्व विभागाचे सहकार्याने राबविला जाणार असल्याची माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी दिली.

याबाबत गौडा म्हणाले, शिवनेरी किल्‍ल्याच्या संवर्धन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत किल्ल्यावरील जैवविविधता संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात येते. मात्र ऐन उन्हाळ्यातील चार महिने पाण्याची टंचाई जाणवू लागल्यानंतर झाडांना पाणी देणे अडचणीचे होते. हि अडचण दूर व्हावी यासाठी जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या पुढाकाराने जैन उद्योग समूहाला शिवनेरी किल्ल्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा देण्याबाबत विनंती केली होती. या विनंतीला जैन समुहाचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर जैन समूहाचे तांत्रिक अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहाय्यक बी.बी.जंगले, वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे आणि सह्याद्रीचे पदाधिकारी यांनी किल्ल्याची संयुक्त पाहणी करून अहवाल सादर केला. या अहवालानुसार अंबरखाना इमारतीच्या मागील वनक्षेत्रावर सुमारे 25 एकर क्षेत्रावर देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठीच्या सिंचनाची सुविधा जैन उद्योग समूहाच्या वतीने केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जैन इरिगेशनच्या वतीने सुमारे २१ लाखांची अत्याधुनिक ठिबक सिंचनाची सामग्री सामाजिक दायित्वातुन बसविण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना जैन इरिगेशनचे पुणे विभागाचे व्यवस्थापक रवि गाडीवान म्हणाले, सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या विनंतीला अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार सह्याद्रीचे सदस्य, वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह गडावरील पाण्याच्या टाक्या, उपलब्ध पाण्याचा साठा, त्याचा कालावधी याची पाहणी करत, ठिबक सिंचनाचा आराखडा आमच्या कार्यालयासह वन विभागाला सादर केला. त्याला अजित जैन यांनी मान्यता दिली आहे. संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधत आम्ही शिवनेरी वरील हिरवाई फुलविण्याबरोबरच जैवविविधता संवर्धनाची कामे करण्यात येतील.

सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री म्हणाले, ‘‘शिवनेरी विकास आणि संवर्धन प्रकल्पाशी आम्ही पहिल्यापासून निगडित आहोत. विविध शासकीय विभागांशी समन्वय साधत विविध विकासकामे सुचवीत असतो. यामध्ये वन आणि पुरातत्त्व विभागाला सुचविलेल्या विविध कामांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असेच काम आम्ही जैन ठिबक उद्योग समूहाला सुचविले. त्याला अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवनेरीवरील जैवविविधता संवर्धनासाठी देशी फळझाडांची लागवड आणि संवर्धन आम्ही करु.’’

झाडांचे होणार वृक्षारोपण आणि संवर्धन

गडावरील जैवविविधता संवर्धनासाठी पक्षी थांबे होण्यासाठी फळ असणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. यामध्ये गावरान बोरे, चिंच, आंबा, करवंद, फणस, जांभुळ आदि विविध प्रकारच्या सुमारे १२५ देशी फळ, फुलांची झाडे असणार आहेत.

शिवनेरी किल्ल्यावर जैन ठिबक म्हणजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा – अजित जैन

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा व दूरदृष्टीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवनेरी हे जन्मस्थळ होय. या किल्ल्यावर वनसंपदा उभारण्यासाठी कंपनीतर्फे अद्ययावत ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी योगदान खूप महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृती जतन करण्याची, त्यासाठी आपल्याकडून हवी ती मदत करण्याबाबत आमचे वडिल भवरलालजी जैन यांची शिकवण आहे. त्यांची शिकवण, तो वारसा आम्हाला मिळाला आहे. सामाजिक बांधिलकी मानून आम्ही शिवनेरी किल्ल्यावर ठिबक सिंचन यंत्रणा बसविण्याचे काम मोठ्या आनंदाने स्वीकारले आहे. महाराष्ट्राच्या रयतेच्या राजाला आमच्यातर्फे हा मानाचा मुजराच अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी दिली.

 

           
           
 
Head Office: Jain Plastic Park, NH No.6 Bambhori, Jalgaon 425001.Maharashtra, India. Tel: +91 257 225 8011., CIN : L29120MH1986PLC042028.
Copyright © 2009 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved